लांजा वेरळमध्ये पूर्ववैमनस्यातून प्रौढावर कोयत्याने सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात जिल्हा रुग्णालयात हलवले


लांजा तालुक्यातील वेरळ गावात पूर्ववैमनस्यातून बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी 7.30 सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने प्रौढावर कोयत्याने सपासप वार केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या हल्ल्यात प्रभाकर उर्फ भाई जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. आरोपीने अचानक कोयता हातात घेत प्रभाकर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. कोयत्याचे वार लागल्याने जाधव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. जखमी अवस्थेत पडलेल्या प्रभाकर जाधव यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे वेरळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button