
युगांडाहून आलेल्या प्रवाशामुळे महाराष्ट्रात इबोला सतर्कता वाढली
नागपूर : युगांडामधून आलेल्या ४७ वर्षीय प्रवाशाला खबरदारी म्हणून २१ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्याच्यात सध्या इबोलाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. नागपूर महापालिकेचे आरोग्य पथक दररोज त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहे.
आफ्रिकेतील काही देशांत इबोलाचा उद्रेक झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर असून विमानतळ, बंदरे आणि जिल्हास्तरावर विशेष देखरेख सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटना यांनी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून, संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष, पीपीई किट, विशेष रुग्णवाहिका आणि उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे नमुना तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या राज्यात इबोलाचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने जनजागृती आणि सतर्कतेवर भर दिला आहे.




