
दापोली तालुक्यातील हर्णे येथे वॉटर पार्क प्रकरणातून बदनामीचा डाव : आमदार अशोक पाटील
दापोली तालुक्यातील हर्णे येथील वॉटर पार्क प्रकरणामुळे दापोली तालुक्यातील राजकारण बुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना शिंदे गटाचे भांडुप येथील आमदार अशोक पाटील यांनी दिले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे भांडुप येथील आमदार अशोक पाटील यांच्या नावाशी संबंधित असलेल्या हर्णे येथील वॉटर पार्कवर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दापोलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी याबाबत शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित बांधकाम हटविण्याचे आदेश शासनाने दिल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच सविस्तर भूमिका मांडताना आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. कोकण किनारपट्टीतील बहुतांश कोळीवाडे सीआरझेड क्षेत्रात येतात. आमचे वॉटर पार्क हे पत्नीच्या नावावर असून त्या ठिकाणी कोणतेही कायमस्वरूपी पक्के बांधकाम करण्यात आलेले नाही. पाटील यांनी पुढे सांगितले की, वॉटर पार्कमध्ये प्रामुख्याने खेळणी, तात्पुरती संरचना आणि कच्च्या स्वरूपाचे बांधकाम असते. अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी सीआरझेडची स्वतंत्र परवानगी आवश्यक नसल्याचा त्यांचा दावा आहे. अलिबागपासून गोव्यापर्यंत अनेक जागामालकांनी सीआरझेड संदर्भातील विषय उच्च न्यायालयात नेलेले आहेत. त्यामुळे हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com



