झाडगाव एमआयडीसीत ५० बेकायदेशीर बांधकामांवर २८ मे रोजी बुलडोझर फिरणार


झाडगाव एमआयडीसी परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर अखेर प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. एमआयडीसी प्रशासनाने परिसरातील सुमारे ५० अनधिकृत बांधकामधारकांना अंतिम नोटिसा बजावत येत्या २८ मे रोजी ही सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईसाठी कडक पोलीस बंदोबस्ताचीही तयारी करण्यात आली असून प्रशासनाने न्यायालयात कॅव्हेट दाखल करून संभाव्य कायदेशीर अडथळ्यांचाही मार्ग बंद केला आहे.
झाडगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर चिर्‍याची घरे, अनधिकृत वीजजोडण्या आणि अतिक्रमणे झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यापूर्वी संबंधितांना दोन वेळा नोटिसा बजावून बांधकामे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्याने आता ही तिसरी आणि अंतिम नोटीस देण्यात आली आहे. संबंधितांना केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर थेट जेसीबीद्वारे कारवाई केली जाणार आहे.
एमआयडीसी प्रशासनाने या कारवाईदरम्यान कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रत्नागिरी पोलीस अधिक्षकांकडे आधीच पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
तसेच, अतिक्र मणधारकांनी न्यायालयातून स्थगिती आणू नये म्हणून प्रशासनाने आधीच न्यायालयात ’कॅव्हेट’ दाखल केले आहे.
दरम्यान, आज नोटिसांचे वाटप सुरू असताना एका स्वयंघोषित पुढार्‍याने शासकीय कामात अडथळा आणत कर्मचार्‍यांशी आरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. ’अधिकारी स्वतः नोटीस द्यायला का आले नाहीत?’ असा सवाल करत संबंधिताने कर्मचार्‍यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाने कोणताही दबाव न मानता कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button