मगरीच्या तावडीतून आईला वाचविणाऱ्या स्वर्णी पवारच्या धाडसाला शिवसेनेचा सलाम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घरी जाऊन शूर बालिकेचा विशेष सत्कार

चिपळूण : वालोपे-गणेशवाडी येथे मगरीच्या हल्ल्यातून आईची सुटका करण्यासाठी अवघ्या १० वर्षीय स्वर्णी भूपेंद्र पवार हिने दाखविलेल्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या या शौर्याची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी स्वर्णीचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

गणेशवाडी येथील गणेश घाटावर स्वर्णीची आई नंदिनी भूपेंद्र पवार (३५) कपडे धुण्यासाठी गेल्या असताना मगरीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या पायाला पकडून त्यांना पाण्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी नंदिनी पवार यांनी नदीकाठावरील दगडाचा आधार घेत प्रतिकार केला.

आईला मगर पाण्यात ओढून नेत असल्याचे पाहताच स्वर्णीने क्षणाचाही विलंब न करता आईच्या मदतीसाठी धाव घेतली. तिने आईला पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मायलेकींच्या प्रतिकारामुळे अखेर मगरीने पकड सोडली आणि नंदिनी पवार यांची सुटका झाली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वर्णीची भेट घेऊन तिच्याशी संवाद साधला. यावेळी स्वर्णीने त्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला. आई संकटात असल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी आपण कशी धाव घेतली, याची माहिती तिने दिली. तिच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नंदिनी पवार यांच्या प्रकृतीचीही पदाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. त्यांच्या उपचारांची माहिती घेत पवार कुटुंबीयांना धीर देण्यात आला.

यावेळी शिवसेना चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख (दक्षिण) सचिन चोरगे, युवासेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, विभागप्रमुख किशोर सातपुते, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, युवासेना उपविभाग अधिकारी शाकीर अरकाटे तसेच महेंद्र (पप्प्या) काणेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्वर्णीचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णीने संकटाच्या प्रसंगी दाखविलेले धैर्य आणि प्रसंगावधान प्रेरणादायी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वर्णीच्या या शौर्याला सलाम करत तिच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button