मोती तलावात युवतीची उडी; वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू


सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरासमोरील मोती तलावात शाळकरी युवतीने उडी घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी एका युवकानेही पाण्यात उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, तलावात उडी घेतलेल्या युवतीचा शोध अद्याप सुरू आहे.

रोहन गोसावी (२५, रा. सरदारवाडी, नाधवडे, ता. वैभववाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत रोहन याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, लिशा भिकाजी गोसावी (१५, रा. कारीवडे, ता. सावंतवाडी) ही शाळकरी युवती तलावात पडल्याचे सांगण्यात येत असून तिचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बाबल आल्मेडा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून मोती तलावाच्या पाण्यात शोधमोहीम राबवली जात आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका युवतीने दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि संबंधित युवती नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. लिशा पाण्यात पडताच तिला वाचवण्यासाठी रोहनने तलावात उडी घेतली. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला.

मात्र, लिशाने तलावात नेमकी उडी घेतली की तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनेपूर्वी ती तलावाच्या रेलिंगवर बसलेली असल्याचा फोटोही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य एका युवतीकडून पोलिसांकडून माहिती घेतली जात असून लिशाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button