
चला शाळेत जाऊया अभियान ; अंमलबजावणी बैठक‘ शिक्षण गुणवत्तेचे, भाकरीचे अन् राष्ट्रीयत्वाचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. 8 ) : शालेय शिक्षण विभागातर्फे चला शाळेत जाऊया अभियान अंमलबजावणी बैठकीत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांमधील मूलभूत सुविधा यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. “शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता ते आनंददायी, भाकरी देणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे,” असा महत्त्वाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, समाजकल्याण सभापती ॲङ सुयोग कांबळे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, कृषी सभापती महेश नाटेकर, महिला व बाल कल्याण सभापती मयुरी शिर्के, शिक्षण संचालक कृष्णकांत पाटील, महेश चोथे, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत आदी उपस्थित होते.
शाळांच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. मंत्रीमहोदयांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या समस्या समजून घ्याव्यात आणि चांगल्या उपक्रमांना दाद द्यावी, असे आवाहन करुन शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेली शारीरिक हालचाल लक्षात घेऊन, दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायत ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी एकाच वेळी २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवून विश्वविक्रम घडवल्याचा उल्लेखही त्यांनी अभिमानाने केला.
शाळा दुरुस्तीचा निधी थेट खात्यात
शाळांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी, रंगरंगोटीसाठी शासकीय लालफितीच्या कारभारात वेळ जाऊ नये म्हणून शाळा दुरुस्तीचा निधी थेट मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) संयुक्त खात्यावर वर्ग करण्याचा शासन निर्णय लवकरच घेतला जात असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
मराठी शाळा टिकवा, पटसंख्या वाढवा
जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांविषयी चिंता व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले, “शाळा बंद करणे हा शासनाचा हेतू नाही; उलट दर्जेदार शिक्षण देऊन या शाळांमधील पटसंख्या वाढवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.” वाशिममधील साखरे गावच्या जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देत, मराठी व सरकारी शाळांमध्येही खासगी शाळांपेक्षा उत्तम वातावरण निर्माण करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य पत्रिका व क्रीडा प्रबोधिनी
येत्या काळात आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक विद्यार्थ्याची पालकांच्या उपस्थितीत सखोल आरोग्य तपासणी करून त्यांना ‘आरोग्य पत्रिका’ (हेल्थ कार्ड) दिली जाईल. याशिवाय, क्रीडागुणांना वाव देण्यासाठी ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर १००’ सारख्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकी पेशा हा केवळ नोकरी नसून समाज आणि देशाची भावी पिढी घडवणारे एक पवित्र व्रत आहे; त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे सांगत त्यांनी उपस्थित शिक्षक व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांच्या हातीच शाळांचा कायापालट; जिल्हाधिकारी मनुज जिंदल
शाळा मोठी असो किंवा एखाद्या झाडाखाली भरलेली, तिच्यात सकारात्मक वातावरण निर्माण करून तिचा संपूर्ण कायापालट करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांच्या हातात असते, असे मनोगत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शाळेची गुणवत्ता सुधारू शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातील सरकारी शाळेत पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतल्याची आठवण सांगत ते म्हणाले, “आज मी ज्या पदावर आहे, त्याचे श्रेय मला शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि आई-वडिलांना जाते. शाळेतील चांगल्या वातावरणामुळे मला नेहमी शाळेत जाण्याची ओढ असायची.” गुरू आणि देव या दोघांमध्ये प्रथम वंदनीय कोण, तर देवाची ओळख करून देणारा गुरूच श्रेष्ठ असतो, असा संत कबीरांच्या दोह्याचा दाखला देत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचा गौरव केला.
‘प्रकल्प भविष्य’ व हायटेक ग्रंथालये: जिल्ह्यातील शाळांमधील जुन्या किंवा वापरात नसलेल्या खोल्यांचे रूपांतर सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून सुसज्ज ग्रंथालये आणि एआय (AI) तंत्रज्ञानयुक्त अध्ययन केंद्रांमध्ये केले जाईल. मूलभूत सुविधांचा विकास: जिल्ह्यातील शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, संरक्षक भिंत आणि सीसीटीव्ही यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी डीपीडीसीच्या (DPDC) माध्यमातून सर्वंकष नियोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात क्रीडांगणे व क्रीडा प्रबोधिनी उभारण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात आदर्श शिक्षक आणि एसएमसी सदस्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम – वैदेही रानडे
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात राबवण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. आपल्या भाषणात मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “स्वतः मी आणि माझी मुलेही मराठी माध्यमातूनच शिकलो आहोत. मातृभाषेतून शिकल्यामुळे शिक्षणाचा कोणताही ताण मुलांवर येत नाही. भाषा केवळ माध्यम असून कोणत्याही टप्प्यावर इंग्रजी अथवा इतर शिक्षणात अडचण येत नाही.”
मुलांचे स्क्रीन टाईम कमी व्हावे यासाठी शिक्षकांनी गृहपाठ अथवा उपक्रम मोबाईलवर देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच जुन्या उपयुक्त पद्धतींना प्राधान्य देत परिपाठामध्ये विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या पाढे म्हणून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. इस्रो व नासा अभ्यास दौरा: जिल्ह्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी त्रिस्तरीय परीक्षा घेऊन आतापर्यंत १५० विद्यार्थी इस्रो (ISRO) तर ६० विद्यार्थी नासा (NASA) अभ्यास दौऱ्यावर जाऊन आले आहेत.
- मुलींच्या आरोग्यासाठी ‘फुलराणी कक्ष’ व एचपीव्ही लसीकरण: जिल्ह्यातील ५५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, इन्सिनरेटर आणि विश्रांती कक्ष असणारा ‘फुलराणी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. याशिवाय ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी ग्रीवा कर्करोग प्रतिबंधात्मक ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत १२,००० मुलींचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- मिशन आरंभ व मिशन अभय: इयत्ता पहिली-दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी ‘मिशन आरंभ’, तसेच मुला-मुलींचे लैंगिक शोषणापासून संरक्षण, ‘गुड टच – बॅड टच’ची समज आणि सायबर सुरक्षिततेसाठी ‘मिशन अभय’ अंतर्गत वर्षभरात १० टप्प्यांचे प्रशिक्षण राबवले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेला ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा पुढे नेत सर्वच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा समान उंचावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी वैदेही रानडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तसेच खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थींनी, आयडॉल शिक्षक, शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार यांनी आभार प्रदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिषा जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्यासह शिक्षक शिक्षिका, पालक उपस्थित होते.
000




