
रत्नागिरी रत्नागिरी शहरा नजीक कुवारबाव साईनगर येथे तरुणाचा खून; उपचारादरम्यान मृत्यू, तीन संशयित ताब्यात
रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर परिसरातील सात बंगल्याच्या मागे एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मृत तरुणाचे नाव सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी, संगमेश्वर; सध्या रा. विरार, मुंबई) असे आहे. ही घटना गुरुवारी (२१ मे) रात्री ९.३० ते १०.५३ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी सूरजची बहीण नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, सूरज काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आला होता. दरम्यान, साईनगर येथील सात बंगल्याच्या मागील परिसरात संशयित सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू यांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर व हातांवर सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सूरजवर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी (२२ मे) दुपारी सुमारे २.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.




