
मिरकरवाडा बंदरात वर्षानुवर्षे समुद्रात पडून राहिलेल्या जुन्या लाकडी नौकांचे अवशेष अखेर मत्स्य व्यवसाय विभागाने हटवले
गजबजलेल्या मिरकरवाड़ा बंदरावरील जेटींचा श्वास गुदमरवून टाकणार्या आणि वर्षानुवर्षे समुद्रात पडून राहिलेल्या जुन्या लाकडी नौकांचे अवशेष अखेर मत्स्य व्यवसाय विभागाने हटवले. बंदरातील या अडथळ्यांमुळे पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात इतर नौका ठेवण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती, ज्याचा आता एका झटक्यात निपटारा करण्यात आला आहे.
मिरकरवाडा बंदरातील मलबारी क्र ४, समीना क्र. २ आणि डिझेल क्र. ३ या महत्त्वाच्या जेटींच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जुन्या लाकडी नौका बेवारस उभ्या होत्या. देखभाल अभावी या नौका फुटून त्यांचे अवाढव्य अवशेष समुद्राच्या पाण्यात बुडाले होते. यामुळे पावसाळ्यात पर्ससीन नेट नौका शाकारून (सुरक्षित) ठेवण्यासाठी जागाच उरली नव्हती. या गंभीर प्रकाराची दखल घेत आयुक्त जे. डी. सावंत आणि अधिकारी अक्षया मयेकर यांनी सोमवारी बंदराची प्रत्यक्ष पाहणी करत ’सर्च ऑपरेशन’ राबवले आणि दुसर्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी जेसीबीद्वारे थेट कारवाई केली.www.konkantoday.com




