
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून २०६ वे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी : नाणीज येथील कै.मंजुळा वसंत तोडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने दि. २० मे २०२६ रोजी दुःखद निधन झाले. निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अत्यंत समाजोपयोगी निर्णय घेत त्यांचे मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून संपन्न झालेले हे २०६ वे मरणोत्तर देहदान ठरले आहे. समाजामध्ये देहदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी दिवंगत मंजुळा तोडकर यांचे पुत्र सुनील वसंत तोडकर तसेच सून सायली सुनील तोडकर उपस्थित होते. तसेच रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने राजन बोडेकर, संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, अनिता जाधव तसेच तोडणकर कुटुंबीय उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर यांच्यासह अनेकांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी देहदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबीयांकडे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या देहदान व अवयवदान कार्याचे विशेष कौतुक केले. जगद्गुरूंच्या प्रेरणेतून रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजला आतापर्यंत पाच देह सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयांना आतापर्यंत २०६ मरणोत्तर देहदान करण्यात आले असून, १६९ अवयवदान देखील यशस्वीरीत्या पार पडले असल्याची माहिती त्यांनी दिली.
समाजहितासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होत असून अनेकांना नवजीवन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजात देहदान व अवयवदानाबाबत सकारात्मक विचार निर्माण व्हावा आणि अधिकाधिक लोकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
*




