
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले; नागरिकांत नाराजी
चिपळूण : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी ३१ मे २०२६ पर्यंतची मुदत दिली असली, तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः कळंबस्ते बौद्धवाडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात अद्यापही महामार्गावरील पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इतर बहुतांश ठिकाणी चार पदरी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असताना या ठिकाणी अद्याप एकाच पदरी मार्गावर वाहतूक सुरू असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच अनेक ठिकाणी महामार्गाचा रस्ता खालच्या पातळीवर असून गटारे उंच झाल्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत आहे. यामुळे वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




