महामार्गावरील धामणी येथील हॉटेलवर मध्यरात्री सुटाबुटातील भामट्यांनी मॅनेजरला फसवत काउंटर मधील रोकड केली लंपास


संगमेश्वर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील ‘श्रद्धा हॉटेल अँड लॉज’मध्ये सोमवारी मध्यरात्री थरारक चोरीची घटना घडली. सुटाबुटात आलेल्या तीन भामट्यांनी श्रीमंत ग्राहकाचा बनाव करत हॉटेल मॅनेजरला जाळ्यात ओढले आणि काऊंटरमधील रोकड घेऊन अंधारात पसार झाले. या धक्कादायक प्रकारामुळे महामार्गालगतच्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री पाऊणे अकराच्या सुमारास एक कार हॉटेलसमोर येऊन थांबली. चालक गाडीतच बसून राहिला, तर दोन जण थेट हॉटेलमध्ये शिरले. त्यांनी अतिशय सभ्यपणे मॅनेजरकडे रूम दाखवण्याची मागणी केली. संशय न आल्याने मॅनेजर त्यातील एकाला घेऊन वर गेला. नेमकी हीच संधी साधत दुसऱ्या भामट्याने काऊंटरवर डल्ला मारला.

काही सेकंदांतच काऊंटरमधील मुख्य रजिस्टर आणि ५ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. मॅनेजर खाली येईपर्यंत चोरट्यांनी आपला डाव साधला होता. तिघेही भरधाव कारमधून महामार्गाच्या दिशेने पसार झाले.
घटनेनंतर हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील हॉटेल्स आणि लॉजेस आता भामट्यांच्या रडारवर आल्याची चर्चा सुरू असून, सुटाबुटातील टोळ्या थेट व्यावसायिकांना लक्ष्य करत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button