
दिवा–चिपळूण मेमूचा विस्तार करून दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याची मागणी
खेड : दिवा वरून गणपती तसेच इतर सणांच्या काळात विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या दिवा–चिपळूण मेमू सेवेचा विस्तार करून ती दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वेकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, सदर मेमू सेवा भविष्यात संगमेश्वरपर्यंत सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कडवई तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात गावी ये-जा करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा प्रवाशांना प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करत असल्याने या मार्गावर स्वतंत्र मेमू सेवा सुरू होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्येही या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या हिताचा विचार करून दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.




