
NEET पेपर लीक प्रकरण: रत्नागिरी शिवसेना UBT ची आक्रमक भूमिका, विद्यार्थ्यांना दरमहा 25 हजार देण्याची मागणी
NEET परीक्षा रद्द: रत्नागिरीतून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, शिवसेना तालुका प्रमुख मयूरेश्वर पाटील, उप तालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, सलिल डाफळे, बावा सावंत, कॉलेज कक्ष तालुका अधिकारी अमन राणे, उपविभाग प्रमुख सचिन सावंत देसाई, माजी विभागप्रमुख विभागप्रमुख शैलेंद्रचव्हाण शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे आदी.
रत्नागिरी, 9 मे 2026: 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET (UG) 2026 परीक्षेचा पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
शिवसेना UBT चे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत हे निवेदन सादर केले. यामध्ये NEET परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या:
1. दोषींवर कठोर कारवाई: पेपर लीक करणारे, त्यांचे सूत्रधार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय व निमशासकीय यंत्रणेतील सर्वांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत.
2. विद्यार्थ्यांना दरमहा ₹25,000 आर्थिक सहाय्य: परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा फेरपरीक्षेची तयारी करावी लागणार आहे. ग्रामीण व कोकणातील गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शहरात राहून अभ्यास करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे फेरपरीक्षा होईपर्यंत शासनाने प्रति महिना किमान ₹25,000/- ची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
3. मोफत निवास सुविधा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शासकीय वसतिगृहे मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत.
“ही परीक्षा केवळ विद्यार्थ्यांची नव्हती, तर त्यांच्याशी जोडलेल्या लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांची परीक्षा होती. पेपरफुटीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नैराश्य आणि मानसिक तणावाचे वातावरण आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचीही स्वाक्षरी आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशाच्या परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या आहेत, त्यामुळे त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती शिवसेनेने केली आहे.




