उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाचा हाहाकार; १०० जणांचा मृत्यू, प्रयागराजमध्ये सर्वाधिक बळी!


उत्तर प्रदेशमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर २४ तासांच्या आत ही मदत संबधित कुटुंबियांना मिळावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मृतांची जिल्हानिहाय आकडेवारी

बुधवारी उत्तर प्रदेशला मुसळधार पावसाने झोडपले. पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसाचा सर्वाधिक फटका प्रयागराजला बसला असून, या ठिकाणी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार,
मृतांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

  • भदोही: १८ मृत्यू
  • मिर्झापूर: १५ मृत्यू
  • फतेहपूर: १० मृत्यू
  • उन्नाव आणि बदायूं: प्रत्येकी ६ मृत्यू
  • प्रतापगड आणि बरेली: प्रत्येकी ४ मृत्यू
  • सीतापूर, रायबरेली आणि चंदौली: प्रत्येकी २ मृत्यू
  • कानपूर देहात, हरदोई आणि संभलमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला असून कौशांबी, शाहजहानपूर, सोनभद्र आणि लखीमपूरमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

पडझड, नुकसान

उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. राज्याच्या विविध भागांमध्ये धुळीच्या वादळ दिसू लागले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज आणि पत्र्याचे शेड हवेत उडाले. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. काही भागात घरांची देखील पडझड झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना अक्षरशः हाताने माती आणि राडारोडा उपसावा लागला.

५० फूट उंच हवेत फेकला गेला व्यक्ती

उत्तर प्रदेशमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची भीषणता दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बरेलीच्या बमियाना गावातील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. वादळी वाऱ्यामुळे पत्र्याच्या शेडसोबत एक व्यक्ती हवेत ५० फूट उंच उडून शेतात फेकली गेल्याचे व्हिडीओत दिसत आहे. नन्हे मियाँ असे या व्यक्तीचे नाव असून या अपघातात त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मिर्झापूरमधील गौरा प्रमाणपूर येथील पूल वाहून गेल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button