
कोकणातील आंबा बागायतदारांच्या १५ मे च्या मुंबईतील मोर्चाला शरद पवार यांचा पाठिंबा!
कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी सध्या मोठ्या संकटात असून, राज्य सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून, आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
सिल्व्हर ओकवर झाली चर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबईत शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार यांनी आंबा, काजू आणि नारळ उत्पादनातील समस्या, नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या आयात-निर्यात धोरणाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे.
सरकारच्या मदतीवर नाराजी
बागायतदारांनी आंब्यासाठी हेक्टरी ५ लाख आणि काजूसाठी ३ लाख रुपयांची मदत मागितली आहे. मात्र, सरकारने केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकरी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ असा धडक मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, कम्युनिस्ट पार्टी, कुणबी सेना यांसह अनेक प्रमुख पक्षांनी पाठिंबा दिला आहे. १५ मे रोजी दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्यानात शेतकरी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच करतील. या बैठकीला दीपक पवार, गणेश गावकर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.




