
मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपांवर सिएनजी पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा, प्रवाशांची मोठी गैरसोय!
मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपांवर सिएनजी पाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा निर्माण झाल्याचे सोमवारी ठिकठिकाणी पहायला मिळाले. महामार्गावरील अनेक पंप कोरडे झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी आलेल्या प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली होती.
ठाणे येथील राहणारे दिनेश नलावडे आपल्या कुटूंबा समवेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे निघाले होते. पनवेलच्या पूढे गेल्यावर गाडीत पेट्रोल भरू असा विचार त्यांनी केला होता पण नागोठण्यापर्यंत महामार्गावरील पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्व पंपावर इंधन संपले असल्याचे बोर्ड लागले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. त्यामुळे आडमार्गाला जाऊन नागोठण्यातील एका पंपावर पेट्रोल भरण्याची वेळ नलावडे यांच्यावर आली.
पनवेल येथे राहणारे सचिन पाटील कामानिमित्ताने पेण तालुक्यातील वडखळ येथे आले होते. मात्र परतीच्या मार्गावर असतांना पंपावर इंधन उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले होते. त्यामुळे डीझेलसाठी शोधाशोध करण्याची वेळ त्यांचावर आली होती. महामार्गावरील नागोठणे ते खेड दरम्यानच्या पट्ट्यातील इतर ठिकाणच्या पंपाची परिस्थिती फारशी वेगळी नाही.
आखाती देशातील युध्दजन्य परिस्थिती पासून महामार्गावरील अनेक पंपावर कमी प्रमाणात इंधन पुरवठा होत असल्याचे सांगीतले जात आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे इंधनाची मागणीत वाढ झाली आहे. ज्या पंपावर इंधन उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या रांगा मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी निघणार असाल तर आधी पुरेश्या प्रमाणात इंधन भरूनच निघण्याचा सल्ला अडकून पडलेल्या प्रवाश्यांकडून सांगीतले जात आहे.




