
भरणे नाका येथे भंगार गोडाऊनजवळ लागलेला वनवा आटोक्यात
खेड : शहरातील भरणे नाका येथील जगबुडी नदी पुलाजवळ असलेल्या भंगारच्या गोडाऊन परिसरात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वनवा लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
रामजी सानेकर यांच्या भंगार दुकानाजवळील परिसरात लागलेली ही आग विश्वजित पाटणे यांच्या जागेकडून पसरल्याचे सांगण्यात आले. आग वाढण्यापूर्वीच अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. तसेच भंगारचे गोडाऊनही सुरक्षित वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या कारवाईत खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाचे फायरमन श्री. श्याम देवळेकर, श्री. दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे आग वेळीच विझवण्यात यश आले.




