
एमटीडीसीचे तारकर्ली पर्यटन केंद्र सर्वोत्तम, ३ कोटी २० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न
कोकणातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्राने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. हे केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात ’सर्वोत्तम पर्यटन केंद्र ठरले असून, वर्षभरात या केंद्राने ३ कोटी २० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. या यशाबद्दल राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी कोकण प्रादेशिक व्यवस्थापक व केंद्राच्या व्यवस्थापकांचे विशेष अभिनंदन केले असून, २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी त्यांचा सत्कार केला जाणार आहे. तारकर्ली पर्यटन केंद्र सर्वोत्तम ठरल्याने त्याचे भित्तीपत्रक तयार करण्यात येऊन पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये अनावरण करण्यात आले आहे.
पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील निळाशार समुद्र, पांढरीशुभ्र वाळू आणि येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायव्हिंग यामुळे पर्यटकांचा ओढा सातत्याने वाढत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांच्या संख्येत २५ टक्क्यांनी मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशी पर्यटकांनीही तारकर्लीला पसंती दिली आहे.
www.konkantoday.com




