देशाची संस्कृती, परंपरा आणि संविधान यांचा अभिमान बाळगत राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची जबाबदारी तरुणांवर:प्रा. नितीन बानगुडे पाटील


  • छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे राष्ट्रपुरुष हे केवळ घोषणा देण्यासाठी किंवा डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाहीत. त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आपल्या डोक्यात आणि आचरणात उतरवणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे. तरुण पिढीने कोणत्याही क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास, भविष्याचा विचार आणि नियोजन करण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे. राष्ट्रपुरुषांकडून घेण्यासारखे हेच खरे गुण आहेत, असे परखड प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे ‘राष्ट्रपुरुषांचा आदर्श आणि नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यानाला चिपळूणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सभागृह खचाखच भरून गेले होते.

या वेळी माजी मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजाभाऊ पाटणकर, रमण डांगे, समीर जानवलकर, नित्यानंद भागवत, शेखर सावले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. बानगुडे पाटील यांनी आपल्या खास खुमासदार आणि ओघवत्या शैलीत तरुण पिढीसमोरील आव्हानांवर भाष्य केले. आज भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो आहे; मात्र त्याचवेळी आपल्या देशातील अनेक तरुण मोबाईलवर गेम खेळण्यात, रील्स पाहण्यात आणि सोशल मीडियात वेळ घालवत आहेत. केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून चालणार नाही, तर त्याचा योग्य उपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि विचारांची श्रीमंती वाढवली पाहिजे. राष्ट्र उभे करण्यासाठी अभ्यासू, विचारशील आणि जबाबदार तरुणांची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या नात्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, महात्मा गांधींना ‘महात्मा’ ही पदवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिली, तर गांधीजींनी टागोरांना ‘गुरुदेव’ म्हणून संबोधले. हा परस्पर सन्मान आणि विचारांचा आदर भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आजच्या तरुणांनीही मतभेद असले तरी परस्पर आदर जपला पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमागील नियोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास, भगतसिंगांचा राष्ट्रासाठीचा त्याग आणि महात्मा गांधींचा सत्य-अहिंसेचा मार्ग यांचा उल्लेख करत त्यांनी तरुणांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रपुरुषांचे फोटो लावून किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवून समाज बदलत नाही. त्यांच्या विचारांचा स्वीकार आणि आचरणातूनच परिवर्तन घडते, असे ते म्हणाले.

तरुणांनी केवळ नोकरी आणि पैशाच्या मागे धावू नये, तर समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासावी, असे सांगताना त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. मोबाईलच्या पडद्यामागील आभासी जगातून बाहेर पडून ग्रंथ वाचा, इतिहास समजून घ्या, देशाच्या प्रश्नांचा अभ्यास करा. विचारवंत पिढी घडली तरच देश सक्षम बनेल, असे आवाहन त्यांनी केले.

देशाची संस्कृती, परंपरा आणि संविधान यांचा अभिमान बाळगत राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची जबाबदारीही तरुणांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज समाजात जात, धर्म, भाषा या आधारे भिंती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र राष्ट्रपुरुषांनी नेहमी माणुसकी, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला. तो संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांकडून वारंवार टाळ्यांचा कडकडाट होत होता. कार्यक्रमानंतर अनेक युवकांनी प्रा. बानगुडे पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या विचारांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे आयोजन चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. नित्यानंद भागवत यांच्या सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button