रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधेमुळे व सेवेमुळे रूग्णांच्या संख्येत वाढ


 रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांनी गेल्या वर्षभरात आरोग्यसेवेत उल्लेखनीय कामगिरी करत रुग्णसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने शस्त्रक्रिया, उपचार आणि सामाजिक बांधिलकी या सर्वच स्तरांवर प्रभावी ठसा उमटवला आहे. आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे सर्वसामान्य रुग्णांचा विश्वास मोठ्याप्रमाणात वाढला असून, बाह्यरुग्ण विभागातील गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे.
स्त्रीरोग व प्रसूती विभागाने यावर्षी विशेष कामगिरी नोंदवली आहे. डॉ. विनोद सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०२५ पासून आतापर्यंत १६४५ नैसर्गिक प्रसूती आणि १०३० सिझर शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. ग्रामीण भागातील माता व बालसंगोपनासाठी ही बाब अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. सर्जरी विभागात डॉ. भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ५६८ मोठ्या आणि ३८६ छोट्या अशा एकूण ९५४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानाच्या वापरातही रुग्णालय आघाडीवर आहे. ईएनटी विभागात डॉ. सुनीता बागे यांच्या प्रयत्नातून दुर्बिणीद्वारे विनाटाका शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून, वर्षभरात ११८३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. नेत्र विभागात डॉ. सुनील ढोकळे यांनी १०६० रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या, तर अस्थिव्यंगोपचार विभागात डॉ. निखिल देवकर यांनी गुडघे व खुबा बदलण्यासारख्या क्लिष्ट शस्त्रक्रियांसह २५२ रुग्णांना दिलासा दिला आहे.
रुग्णालयाची सामाजिक बांधिलकीही तितकीच प्रभावी ठरत आहे. देहदान चळवळीला येथे चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांच्या समन्वयाने १९ देहदान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button