राजापुरातील टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षाशासकीय टँकर परत मिळवण्यात प्रशासन अपयशी; खासगी टँकरवर अवलंबित्व वाढले


राजापूर : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजापूर पंचायत समितीने तालुका टंचाईमुक्त घोषित करत सन २०१७-१८ दरम्यान शासकीय टँकर लांजा पंचायत समितीकडे वर्ग केला होता. मात्र त्यानंतरही तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या कायम असून, शासकीय टँकर परत मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे प्रशासनावर आर्थिक ताण वाढत असूनही, शासकीय टँकर परत मिळवण्यासाठी ठोस हालचाल होताना दिसत नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च-एप्रिल महिन्यापासून तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होऊ लागली आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या व नाले उन्हाळ्यात कोरडे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दिड-दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
सद्यस्थितीत वडवली गावातील सर्व वाड्या तसेच कोंडये येथील सम्राट अशोक नगर येथून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मागणी होऊनही पंधरा दिवस उलटून गेले तरी संबंधित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
दरम्यान, खासगी टँकर अधिग्रहित करताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून मिळणारे भाडे कमी आणि उशिरा मिळत असल्याने अनेक टँकर मालक प्रशासनाला वाहने देण्यास टाळाटाळ करत आहेत.
वाढत्या तापमानामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता असून, यंदा तरी पंचायत समिती प्रशासन शासकीय टँकर परत मिळवणार का, की पुन्हा खासगी टँकरवर खर्च करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button