
परदेशी नोकरीच्या आमिषाने ५६ तरुणांची ५० लाखांची फसवणूक
रत्नागिरी : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ५६ तरुणांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील मिरजेळे येथील दोघा संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इसाम इरफान जांभारकर व अस्लम इरफान जांभारकर (दोघे रा. एमआयडीसी मिरजोळे, फिनोलेक्स कॉलेज परिसर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १ जुलै २०२५ ते १ मे २०२६ या कालावधीत एमआयडीसी मिरजोळे येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सज्जाद अहमद खान (वय ५४, रा. शाहिन बाग, जामियानगर, नवी दिल्ली) यांना संशयितांनी परदेशात कामगार पाठवून कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी ५६ तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. यानुसार, प्रत्येक कामगाराकडून ८५ हजार रुपये प्रमाणे एकूण सुमारे ५० लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, संबंधित तरुणांना ठरलेल्या ठिकाणी न पाठवता अन्यत्र पाठवण्यात आले. परिणामी, हे कामगार अडचणीत सापडले. या परिस्थितीत फिर्यादी सज्जाद खान यांना सर्व ५६ कामगारांना स्वतःच्या खर्चाने परत भारतात आणावे लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी सज्जाद खान यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.




