
पेट्रोल-डिझेल ४ ते ५ रुपयांनी तर घरगुती गॅस ४० ते ५० रुपयांनी महागणार? सरकारच्या हालचाली सुरू!
Petrol Diesel Price Hike : देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची शुक्रवारी वाढ करण्यात आली. यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
‘पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा सरकार विचार करत आहे’, अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने सरकार दरवाढ विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४-५ रुपयांची वाढ?
सरकारी सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ४-५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे ४०-५० रुपयांची वाढ होऊ शकते. याला मंजुरी मिळाल्यास, जवळपास चार वर्षांतील ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील पहिली दरवाढ असणार आहे. २०२२ पासून सरकारकडून किरकोळ दर मोठ्या प्रमाणात स्थिर ठेवण्यात आले आहेत.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका समाप्त झाल्यानंतर देशात इंधन आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली जाईल, असा दावा लोकसेभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला होता. पण, सरकारने हा दावा फेटाळून लावत दरवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय पुरवठ्यात येणारा व्यत्यय, वाहतुकीसाठी निर्माण झालेले धोके आणि एकंदर अस्थिरतेच्या वातावरणामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, यामुळे तेल विपणन कंपन्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.




