माकड पकडण्याचे मानधन वाढले, आता ३०० रुपयांऐवजी ६०० रुपये मिळणार


कोकण पट्ट्यात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि बागायतदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने माकड पकडणार्‍या व्यक्ती किंवा संस्थांच्या मानधनात थेट दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागापासून ते किनारपट्टीपर्यंत माकडांच्या टोळ्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. हापूस आंबा, काजू तसेच इतर फळबागांवर माकडांचा अक्षरशः कहर सुरू असून, अनेक शेतकर्‍यांनी या भीतीमुळे बागांकडे पाठ फिरवल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या समस्येची दखल घेत राज्य सरकारने दि. २२ एप्रिल रोजी विशेष शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, एका माकडाला पकडण्यासाठी दिले जाणारे मानधन ३०० रुपयांवरून वाढवून ६०० रुपये करण्यात आले आहे. मानधनातील ही वाढ माकड पकडणार्‍या पथकांसाठी मोठे प्रोत्साहन ठरणार आहे.
पूर्वी मानधन अपुरे असल्याने अनुभवी व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्था हे काम करण्यास फारशा उत्सुक नव्हत्या. मात्र, आता वाढीव मोबदल्यामुळे माकड पकडण्याच्या मोहिमा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवता येणार आहेत. यामुळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनालाही खासगी पथकांच्या मदतीने नियोजनबद्ध कारवाई करणे सुलभ होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि काजू उत्पादन हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. माकडं केवळ फळे खाऊन नुकसान करत नाहीत, तर झाडांच्या फांद्या तोडणे आणि मोहोर झटकणे यामुळे उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे या निर्णयामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button