
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता न.प. क्षेत्रात लवकरच ’पाईपद्वारे गॅस’
केंद्र सरकारने नैसर्गिक वायू वितरणाबाबत घेतलेला महत्त्वाचा निर्णय आता रत्नागिरी जिल्ह्यातही लागू झाला असून, यामुळे शहरांमधील घराघरात थेट पाईपद्वारे गॅस (पीएनजी) पोहोचवण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.
रत्नागिरीतील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात गॅस पाईपलाईनचे जाळे विस्तारण्यातील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे आता दूर झाले आहेत.
सध्या अनेकदा एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने पाईप्ड नॅचरल गॅसवर (पीएनजी) भर दिला आहे. नळाद्वारे मिळणारा हा गॅस एलपीजीच्या तुलनेत अधिक सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणापूरक मानला जातो. एकदा का ही पाईपलाईन तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचली की, सिलिंडर संपण्याची धास्ती कायमची मिटणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अनिलकुमार उगले यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्यांना याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता जिल्ह्यातील सर्व नागरी भागांत गॅस वितरणासाठी एकसमान कार्यपद्धती राबवली जाणार असल्याने, लवकरच गॅस पाईपलाईनच्या खोदकामाला आणि जोडणीला सुरुवात झालेली पाहायला मिळेल. या नव्या सुविधेमुळे रत्नागिरीकरांचा स्वयंपाकघरातील प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक होणार आहे.www.konkantoday.com




