मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉप येथे दुचाकी-पादचारी अपघात ., चार जण जखमी !


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉप येथे शुक्रवारी (दि. 24 एप्रिल 2026) रात्री सुमारे 8:20 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि पादचारी यांच्यात अपघात होऊन चार जण जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरणे शिंदेवाडी येथून भरणेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारासमोर अचानक एक पादचारी आल्याने दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील व पादचारी असे एकूण चार जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भरणेनाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीनरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिजधाम यांची 24 तास अपघात मदतीसाठी कार्यरत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ तसेच भरणे सरपंच संतोष गोवळकर व माजी सरपंच खेराडे यांच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी हलविण्यात आले.
जखमींमध्ये जयसिंग सखाराम खोपटकर (वय 60, रा. भरणे जाधववाडी), दिनेश गुलाब चव्हाण (वय 40, रा. भरणे शिंदेवाडी), संस्कृती दिनेश चव्हाण (वय 11) आणि समृद्धी दिनेश चव्हाण (वय 12) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती.
रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परतेने मदतकार्य पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button