महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी मंगेश जोशी यांची नियुक्ती


. मंगेश जोशी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे नवे संचालक; संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला


मुंबई, : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच केलेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार, श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से) यांची महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. जोशी यांनी मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथील पर्यटन संचालनालयाच्या मुख्यालयात आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला.

श्री. मंगेश जोशी हे अनुभवी प्रशासकीय सनदी अधिकारी असून, या नियुक्तीपूर्वी त्यांनी पुणे येथील ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ (यशदा) येथे उपमहासंचालक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रशासकीय सुधारणा, धोरणात्मक नियोजन आणि प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव असून, त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आता राज्याच्या पर्यटन विकासासाठी होणार आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्री. मंगेश जोशी म्हणाले , “महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध राज्य आहे. पर्यटन विभागाच्या विद्यमान धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि राज्यातील पर्यटन स्थळांची जागतिक स्तरावर व्यापक प्रसिद्धी करणे ही प्राथमिकता असेल. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर एक अग्रगण्य आणि सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचा मानस आहे. तसेच, शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना देऊन राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

राज्यातील गड-किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गपर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जपून आधुनिक सुविधांच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आगामी काळात विशेष उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आमच्या बद्दल
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.
सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button