उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर पुन्हा येणार? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आग्रह नेमका काय?


मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

कारण, येथील जागेवर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे आमदार होते, त्यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर आता कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिवसेनेसह इतरही पक्षातील नेत्यांना आहे. त्यामुळेच, आधी काँग्रेस आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानपरिषदेच्या जागेसाठी एकच नाव सुचवलं, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषद निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सुप्रिया सुळेंची उद्धव ठाकरेंबाबतची पोस्ट नेमकी काय?

‘महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती.’ अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधानपरिषदेवर जाणार का?

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच जनतेला होईल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची पोस्ट काय?

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्यांचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण, त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबतही आताच स्पष्टता करावी लागेल. महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही, असे वडेट्टीवार यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत मा. उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारत असतील तर स्वागतच.अन्यथा महाविकास आघाडी चा उमेदवार कोण, यावर तिन्ही पक्षांनी समन्वयाने निर्णय घ्यावा.

तसेच पुढील राज्यसभा जागेबाबतही आताच स्पष्टता आवश्यक आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग आणि उद्धव ठाकरे विधान परिषद आमदार

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडी हा राज्याचा राजकारणातला असा प्रयोग होता जो कुणीही कधीही गृहीत धरला नव्हता. भाजपा आणि शिवसेना युतीचा विजय झाला होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. मात्र मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपा यांचा संघर्ष झाला. ज्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी जन्माला आली. या सरकारचे मुख्यमंत्री होते ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली नव्हती. पण महाविकास आघाडीकडे तेव्हा संख्याबळ होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला. त्यावेळी त्यांनी सभागृहात भाषण केलं होतं. तसंच आता विधानपरिषदेची निवडणूक येते आहे ती उद्धव ठाकरेंनी लढावी अशी इच्छा त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांनी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोहोंनी व्यक्त केली आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

१९९९ च्या सुमारास उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरले.

२००३ मध्ये त्यांच्याकडे शिवसेना कार्याध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली.

शिवसेनेची आक्रमक संघटना अशी प्रतिमा बदलून त्यांनी सुसंस्कृत पक्ष अशी नवी ओळख निर्माण करण्यात उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे.

१७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख हे पद आलं. २०१४ च्या मोदी लाटेतही राज्यात ६३ आमदार निवडून आणण्याची किमया उद्धव ठाकरेंनी घडवली.

२०१९ ला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले.

२०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार राज्यावर आलं. उद्धव ठाकरे हे तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते.

२०१९ मध्येच उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार झाले.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आणि शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन शिवसेनेवरच दावा सांगितला. आत्तापर्यंतचं हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं.

यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. तर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव मिळालं तर उद्धव ठाकरेंनी पक्षचिन्ह म्हणून मशाल निवडली.

उद्धव ठाकरे हे त्यांच्या खास अशा ठाकरी शैलीतील भाषणांसाठीही ओळखले जातात. महापालिका निवडणुकांच्या आधी म्हणजेच डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी राज ठाकरेंशीही युती केली. मात्र मुंबई महापालिकेवर त्यांना सत्ता मिळवता आली नाही. तरीही त्यांच्या पक्षाने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली हे नाकारता येणार नाही.

विधान परिषदेच्या जागांसाठी १२ मे रोजी मतदान

विधान परिषदेच्या जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील २८८ आमदार मतदान करतील. उमेदवार संख्येवर ही निवडणूक बिनविरोध किंवा मतदान महत्त्वाचं ठरणार हे ठरणार आहे. यात सिंगल ट्रान्सफरेबल व्होट पद्धत वापरली जाते. एका उमेदवारासाठी कोटा सुमारे २८ मतं लागतात. या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपाला मिळणार आहेत हे दिसून येतं आहे कारण त्यांच्याकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना एक-एक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी तर्फे एका जागेवर उमदेवारी मिळेल.ही जागा उद्धव ठाकरेंनी लढवावी असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह आहे. हा आग्रह उद्धव ठाकरे मान्य करणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button