
शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांचेकडून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
चिपळूण : शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादुरशेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी बहादूरशेख नाका येथे या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत तसेच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. विक्रांत जाधव, चिपळूण रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष श्री बाळा आंबुर्ले, नगरसेवक श्री. विकी नारळकर, श्री. फैसल कास्कर आदी त्यांच्यासोबत होते.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता श्री. नाजीम मुल्ला, शाखा अभियंता श्री. शाम खुनेकर, ब्लूम कंपनीचे टीम लीडर श्री. वाय. एस. राव, स्ट्रक्चरल इंजिनियर श्री. अमोल कारंडे, ब्रिज इंजिनियर श्री. अर्जुन छत्तोराय, प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सातपुते, सुरक्षा अभियान श्री. शहाबुद्दीन रशीद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.




