​सावधान! रत्नागिरीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी; सायबर भामट्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन


*​रत्नागिरी, दि. २२ जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे आणि फोटोंचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. बनावट व्हॉट्सॲप अकाउंटद्वारे नागरिकांकडे आर्थिक मागणी केली जात असून, अशा फसव्या मेसेजला बळी पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
​गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज पाठवत आहेत. यामध्ये “अत्यंत तातडीची गरज आहे” असे भासवून बँक खाते क्रमांक किंवा यु.पी.आय. (UPI) द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जात आहे. हा प्रकार गंभीर असून प्रशासनाने याची दखल घेतली आहे.
*​प्रशासनाकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:*
​अधिकृतता तपासा: कोणताही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वैयक्तिकरित्या किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कधीही पैशांची किंवा आर्थिक व्यवहाराची मागणी करत नाही. असा मेसेज आल्यास त्याची खातरजमा करा.
​आर्थिक व्यवहार टाळा: अज्ञात किंवा संशयास्पद क्रमांकावरून आलेल्या मेसेजमधील बँक खात्यात कोणतेही व्यवहार करू नका. तसेच, कोणत्याही ‘कन्फर्म’ नसलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
​गोपनीयता पाळा: अशा मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका. आपली वैयक्तिक किंवा कार्यालयीन गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका.
​तक्रार नोंदवा: असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच सायबर सेल यांच्याशी संपर्क साधावा.
​प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे दिशाभूल करणाऱ्या अशा संदेशांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button