दापोली तालुक्यातील गव्हे येथे भरदिवसा घरफोडी , तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास


दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भैरी देवीच्या यात्रेनिमित्त फिर्यादी कुटुंबियांसह घराबाहेर गेले असताना ही चोरी झाली असून, यामध्ये रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या घरफोडीप्रकरणी फिर्यादीने आपल्या शेजाऱ्यावरच संशय व्यक्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गव्हे पवारवाडी येथील रहिवासी अशोक गोविंद पवार (५१) हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. १० एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडले. त्यानंतर दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीच्या मदतीने उघडून त्यातील ऐवज चोरला. यामध्ये १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ज्यात पाच विविध प्रकारचे गंठण, हार आणि चपली हार यांचा समावेश आहे, असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button