नागरी संरक्षण दलाचे मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज संपन्न

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत नागरी संरक्षण दलातर्फे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 9 एप्रिल 2026 रोजी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रनपार येथे मॉक ड्रिल आणि ब्लॅक आऊट एक्सरसाइज आयोजित करण्यात आली.

औद्योगिक स्थळांवर शत्रूच्या ड्रोन हल्ल्याची काल्पनिक परिस्थिती गृहीत धरून या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते. अशा हल्ल्यांमुळे देशाच्या उत्पादन क्षमता आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक, गृह रक्षक दल, एनसीसी कॅडेट्स, तटरक्षक दल, जिल्हा पोलीस, अग्निशमन दल तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अग्निशमन व सुरक्षा पथक सहभागी झाले होते.

रात्री सुमारे 8 वाजता फिनोलेक्स निवासी परिसर आणि स्टाफ क्वार्टर्स येथे शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक आऊट एक्सरसाइज घेण्यात आली. यामध्ये बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांना प्रथमोपचार देऊन जवळच्या रुग्णालयात पाठवणे, लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे आणि मालमत्तेचे नुकसान कमी करणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.

या सरावात सामान्य नागरिकांचाही सहभाग घेण्यात आला. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा पद्धतीने प्रतिसाद द्यावा, याबाबत त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button