
विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. पॅन-पॅन कॉलनंतर लँडिंग. बंगळुरूला जाणारे विमान मुंबईतच उतरवले!
मुंबई : उड्डाण केल्यानंतर इंजिन बंद पडल्याने एअर इंडियाच्या मुंबईहून बंगळूरूला जाणाऱ्या विमानाने इमर्जन्सी ‘पॅन-पॅन’ कॉल दिला. त्यानंतर तात्काळ विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरविण्यात आले आणि विमानातील प्रवाशांची सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुंबई विमानतळावरून एअर इंडियाच्या एआय २८१२ या विमानाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर २.३० च्या सुमारास उड्डाण केले. उड्डाणानंतर काही क्षणातच विमानाच्या एका इंजिनमध्ये मोठा बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आहे. वैमानिकाने तात्काळ ‘पॅन-पॅन’ कॉल दिला. त्यानंतर तात्काळ हे विमान मुंबई विमानतळावर परतले. विमानाचे उड्डाण होत असताना एक विशिष्ठ आवाज झाला व त्यातून ठिणग्या पडल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.
‘पॅन-पॅन’ कॉल म्हणजे काय ?
विमानाने हवेत उड्डाण घेतल्यानंतर काही बिघाड वाटला, तर तातडीच्या मदतीसाठी ‘पॅन-पॅन’ कॉल केला जातो. याचा अर्थ त्वरित जीवाला धोका असलेली आपात्कालीन स्थिती नाही, परंतु तातडीने मदतीची गरज असल्याचे समजले जाते.




