
कोकणनगर येथील दुकानदारांसाठी नगर परिषद बांधणार हक्काचे गाळे
रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील रस्त्याकडेला असलेल्या अनधिकृत दुकानांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. नगर परिषदेने या ठिकाणी कठोर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी समन्वयाची भूमिका घेतली आहे. येथील दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी स्वतः व्यापारी गाळे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने चर्मालय येथील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा केला होता. मात्र कोकणनगर परिसरातील सुमारे ७० ते ८० अनधिकृत दुकाने आणि शेड अद्यापही कायम आहेत. विमानतळाच्या विविध तांत्रिक यंत्रणांसाठी या मार्गावर भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रस्त्याकडेची ही अतिक्रमणे हटवणे अनिवार्य झाले आहे.
प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही आणि दुकानदारांनी वेळ मागून घेऊनही स्वतःहून अतिक्रमणे काढली नव्हती मात्र या दुकानदारांचा उदरनिर्वाह पूर्णपणे याच व्यवसायावर अवलंबून असल्याचे लक्षात घेऊन मुख्याधिकारी आणि प्रशासनाने संवेदनशील निर्णय घेतला आहे.www.konkantoday.com




