
जिल्हा परिषद विषय समित्या बिनविरोध
बांधकाम समितीत विरोधकांना संधी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य निवड प्रक्रियेत सुरुवातीला निवडणूक रंगण्याची चिन्हे दिसत असतानाच अखेर सर्व समित्या बिनविरोध निवडल्या गेल्या. विरोधी सदस्यांनी काही समित्यांसाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
या प्रक्रियेत विरोधी पक्षाला बांधकाम समिती सदस्यपद देण्यात आले, तर राष्ट्रवादीच्या सदस्याला समिती बदलून देत समाधानाचा मार्ग काढण्यात आला. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निवळून वातावरण खेळीमेळीचे झाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष विलास चाळके तसेच सर्व सभापती उपस्थित होते. स्थायी, जलव्यवस्थापन, वित्त, शिक्षण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण अशा विविध समित्यांसाठी सदस्य निवड प्रक्रिया पार पडली.
स्थायी, जलव्यवस्थापन, बांधकाम आणि समाजकल्याण समित्यांसाठी विरोधी सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. सर्व अर्ज वैध ठरल्याने निवडणुकीची शक्यता निर्माण झाली होती. अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांशी चर्चा केली. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत समन्वय साधला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधी सदस्यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला स्थायी समितीसाठी विरोधक ठाम होते. मात्र बांधकाम समिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली. ठाकरे गटाचे प्रमोद निवळकर यांना बांधकाम व कृषी समितीवर सदस्य म्हणून स्थान देण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर यांनी जाहीर सदस्यत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना आरोग्य समितीऐवजी बांधकाम व कृषी समितीवर सदस्य म्हणून संधी देण्यात आली.
शेवटी सर्वानुमते आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सर्व समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली.




