लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात विराट मोर्चा

खेड : संपूर्ण राज्यभरात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्यावर शेकडो ग्रामस्थ, पर्यावरवादी कोकणवासीयांचा विराट मोर्चा धडकला. या कारखान्यात तयार करण्यात येणारे पी फास हे घातक रसायन हे संपूर्ण कोकणाच्या मानवी जीवनावर आणि निसर्गावर अत्यंत वाईट आणि दूरगामी परिणाम करणारे असून हे उत्पादन घेणारा हा कारखाना बंद झालाच पाहिजे या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी येथे मोर्चा काढला.

इटलीमधील वादग्रस्त मिटेनी कंपनीमध्ये पीफास (PFAS) या रसायनाची निर्मिती केली जात होती. मात्र त्या प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणारे टाकाऊ रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता त्याची विल्हेवाट थेट नदीत सोडून लावली गेली होती. परिणामी इटलीतील पाणी दूषित होऊन सुमारे तीन ते चार हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर असले विष आमच्या निसर्गरम्य कोकणात आणून इथले मानवी जीवन आणि कोकणचा निसर्ग उद्ध्वस्त करण्यामागे सरकारचा हेतू काय? असा संतप्त सवाल परिसरातून केला जात होता. म्हणूनच या कारखान्याला विरोध करण्यासाठी स्थानिक सामाजिक संघटना कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चा आयोजित केला. या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलना बाबतची भूमिका स्पष्ट केली आणि मनसेने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. परिणामी मनसे सोबतच आणखीही काही संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आणि मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले. या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खात्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर मोर्चेकर्‍यांना कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावरच मोर्चा थांबवण्यासाठी बॅरिगेट्स लावण्यात आले होते. हा मोर्चा मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सल फाटा येथून निघाला आणि पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेपर्यंत पोहोचला. मोर्चामध्ये सहभागी झालेले महिला आणि पुरुष आंदोलक जोरदार घोषणा देऊन कारखान्याचा तसेच या कारखान्याला परवानगी देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करत होते. आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि ते आमच्या जीवनाचा आणि निसर्गाचा लिलाव करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. पीफास रसायनाच्या निर्मितीमधून किंवा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रदूषण अथवा जीवितहानी झाली, तर त्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ इतकेच काय तर भारत सरकारकडे सुद्धा कायदा अस्तित्वात नाही. मग असे असताना भविष्यात काही दुर्घटना घडली तर या कारखान्यावर कारवाई करणे शक्य होईल का? असा सवाल आंदोलनकर्ते विचारत आहेत. मग हा कारखाना कोणाच्या फायद्यासाठी आणि आशीर्वादाने आमच्या कोकणवासीयांच्या माथी मारला जात आहे? असाही सवाल उपस्थित करत ‘जोपर्यंत असा कायदा तयार होत नाही तोपर्यंत हा कारखाना बंद राहिला पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत’ असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले.
आताही शासन आणि सरकारने जर दखल घेतली नाही तर आमचे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे होईल असा इशाराही आंदोलकांनी दिला.
यावेळी धरणे आंदोलनाला बसलेले अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, उदय घाग, कांचन चाळके, रवींद्र गोवळकर, अविनाश आंबे, दिलीप घाग, सचिन चाळके, संजय चाळके, पं.स. सदस्य अजय चाळके, मनसे दक्षिण रत्नागिरी संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरही अनेक संघटना आणि शेकडो कोकणवासीय महिला आणि पुरुष आंदोलन उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदन प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार श्री. सीनकर यांच्याकडे दिले आणि मोर्चाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button