
राजापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जासाठी प्रयत्नशील : आमदार किरण सामंत
राजापूर : तालुक्यातील आरोग्य
सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून लवकरच राजापूर ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आणि तालुक्यातील प्रलंबित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला चालना देऊ, असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. शनिवारी राजापूर ग्रामीण रुग्णालयातील ब्लड स्टोअरेज युनिटचे उद्घाटन आ. सामंत यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी ते बोलत होते.
तालुक्यातील जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरूस्ती, कर्मचारी निवासस्थानांची दुरूस्ती अशी कामे प्राधान्याने केली जात आहेत. ७ एप्रिलला मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक होणार असून, यात या मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध असून आता निधीसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. नागले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री आदी उपस्थित होते.
यावेळी उपसभापती श्री. गुरव यांनी १०८ रुग्णवाहिकेतून केवळ रत्नागिरी येथे रुग्ण घेवून जाण्यास परवानी आहे; मात्र काही वेळा रुग्णाला कोल्हापूर येथे हलवावे लागते, अशावेळी रुग्णवाहिका मिळत नसल्याने
रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असते, त्यामुळे कोल्हापूर येथे रुग्ण नेण्यासाठी देखील १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगताप यांनी जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.



