
कोकणनगर भागातील दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून व्यापारी गाळ्यांचा प्रकल्प उभारण्यात येणार
रत्नागिरी शहरातील कोकणनगर भागातील अनधिकृत दुकानांचा प्रश्न सोडवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकणनगर मार्गावरील अतिक्रमित शेड हटविण्याबरोबरच संबंधित दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून व्यापारी गाळ्यांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रस्ताव ३० मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
कोकणनगर परिसरात सुमारे ७० ते ८० अनधिकृत दुकाने असून, या ठिकाणी विमानतळाशी संबंधित टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविणे आवश्यक झाले आहे यापूर्वी चर्मालय येथील अतिक्रमण हटविल्यानंतरही कोकणनगर येथील दुकाने कायम होती. दुकानदारांनी वेळ मागूनही अतिक्रमणे न काढल्याने पालिकेने समन्वयाचा मार्ग स्वीकारत पुनर्वसनाचा निर्णय घेतला.
नवीन गाळ्यांच्या वाटपासाठी नियमित घरपट्टी व मालमत्ता कर भरणार्या करदात्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच एका व्यवसायिकाला केवळ एकच गाळा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते व दुकानदार यांच्यात एकमत झाले आहे. या निर्णयामुळे कोकणनगर भागातील अडचण दूर होणार असून, अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे व्यवसाय करणार्या लहान दुकानदारांना अधिकृत आणि हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.www.konkantoday.com




