आविष्कार संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिर व श्री. शामराव भिडे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा स्वा. सावरकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे होत्या.

या प्रसंगी ओवेन्स कॉर्निंग इंडिया प्रा. लि. चे सीएसआर प्रमुख डॉ. भालचंद्र पेढांबकर, सीएसआर समन्वयक सागर खरात, सांगली येतील सेव्हन सेजेस प्राथमिक शाळा व चाफळकर इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी, गायिका सौ. पूजा देसाई-चाफळकर, उद्योजक सागर चाफळकर, संस्थेचे अध्यक्ष सीए बिपीन शहा, सचिव डॉ. सोनाली कदम, कोषाध्यक्ष सीए शैलेश हळबे, मुख्याध्यापिका सौ. मानसी कांबळे तसेच व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर उपस्थित होते. डॉ. सोनाली कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व संस्थेची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर “पाणी हरवलं, कोणी ते चोरलं” या गीतावरील नृत्यातून पाणी संवर्धनाचा प्रभावी सामाजिक संदेश देण्यात आला. पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी मांडला. “नन्हा मुन्ना राही हूं”, “सांग आई”, “जिस देश में गंगा रहता है”, “फिर भी दिल है हिंदुस्थानी”, “शिवकन्या”, “देस रंगिला”, “काठी आणि घोंगडं”, “डोईवर भरली घागर रे”, “मेरा जूता है जपानी”, “इंडियावाले”, “राधा तेरी चुनरी” आणि “सुनो गौर से” या गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सांगता “पसायदान”ने झाली.

पाटणकर, वाळकाबाईंना पुरस्कार
संस्थेच्या वतीने विश्रांतीदेवी शेरे आदर्श शिक्षक पुरस्कार वाळकाबाई वायळ यांना, तर शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार फातिमा पाटणकर यांना डॉ. पेढांबकर व सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या वेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास व कला विशेष उल्लेखनीय आहे. या मुलांमध्ये काही कमी नाही, तर बरीच कला दडलेली आहे. संस्थेला ज्या ज्या गोष्टीची गरज असेल, तू पूर्ण करेन. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. या कलेला वाव देऊ व ही मुले स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी मदत करूया, असेही सांगितले.

डॉ. भालचंद्र पेढांबकर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक करताना शिक्षकांच्या परिश्रमांची दखल घेतली. ओवेन्स कंपनी गेल्या वर्षभरापासून संस्थेशी जोडली गेली असून संस्थेच्या कार्यात सहकार्य करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. सागर खरात यांनी मतिमंद मुलांसाठी संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुक करून समान संधी देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

पूजा देसाई-चाफळकर यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करत या मुलांनी इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करावे, असे मत व्यक्त केले.
सकाळच्या सत्रामध्ये ओवेन्स कॉर्निंग इंडियाने सीएसआरमधून विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त वस्तूंचे वितरण डॉ. पेढांबकर व श्री. खरात यांनी केले. हा कार्यक्रम आविष्कार संस्थेमध्ये झाला. या वेळी संस्थेचे कार्य, नीटनेटकेपणा आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आविष्कार संस्था १९८६ पासून कार्यरत असून यंदा ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे. सुमारे महिनाभराच्या सरावातून विद्यार्थ्यांनी निरागसतेने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालक व हितचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक सचिन चव्हाण यांनी, तर बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. समिना काझी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button