
चर्मालय- कोकणनगर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांची प्रशासनाकडे धडक
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील मजगांव मार्गावरील रस्त्यांच्या भयनिक दुरवस्था बनली आहे. चर्मालय चार रस्ता ते क्रांतीनगर, कोकण नगर आणि कीर्ती नगरपर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी बुधवारी नगर परिषद धडक देत संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले.
याप्रश्नी नौसीन काझी यांनी सामाजिक कार्यकर्ते एजाज इबजी यांच्यासह मुख्याधिकारी वैभव मारवे यांची न.प.मध्ये भेट घेत हा प्रश्न त्यांच्यासमोर निवेदन देत मांडला आहे. जर मी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करू शकतो, तर सर्व यंत्रणा असूनही शासन का नाही करू शकत? असा रोकठोक सवाल काझी यांनी प्रशासनाला विचारला आहे. कोकणनगर मार्गे विमानतळाकडे जाणारा हा रस्ता केवळ स्थानिक रहिवाशांसाठीच नाही तर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. रत्नागिरी विमानतळ, औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील ग्रामीण भाग्ग्रांना जोडणारा हा मुख्य दुवा आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की, येथून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे ठरत आहे. स्थानिक नागरिकांना दररोज मरणयातना सोसाव्या लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याचे काझी यांनी दाखवून दिले.www.konkantoday.com




