संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासाठी कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटरची मागणी

▪️रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ व २ वर कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटर बसविण्याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) यांना बेलापूर येथे निवेदन सादर करण्यात आले.

▪️“निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयीचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आला आहे. संगमेश्वर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत उपयुक्त ठरते.

▪️मात्र, या स्थानकावर कोच पोजिशन दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गाडी येण्यापूर्वी आपल्या आरक्षित डब्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी थांबल्यानंतर प्रवाशांची धावपळ होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

▪️विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा योग्य डब्यापर्यंत वेळेत पोहोचता न आल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे.
इतर अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असून संगमेश्वर रोड स्थानकावरही ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

▪️प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button