
राजापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावाला मंजुरी
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव पारित
राजापूर : गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या राजापूर नगरपालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावाला पुन्हा नव्याने गती देण्याचा व शहराची हद्द वाढविण्यासाठी पुन्हा शासनाकडे नव्याने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचा एकमुखी ठराव मंगळवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला.
तर शहरातील नवीन पाणीपुरवठा डीपीआर कामात निर्माण होणाऱ्या अडचणी, पाणीसाठवण टाक्यांचा प्रश्न यांसह या कामासाठी होणारी रस्त्यांची खोदाई यावर चर्चा करून योग्य प्रकारे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी लवकरच एका विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णयही सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला.
राजापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. याप्रसंगी अभिजित कुंभार यांसह नगरसेवक व प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवर असलेल्या शहराच्या हद्दवाढ प्रस्तावाला मंजूरी देण्याचा विषयावर चर्चा करण्यात आला. राजापूर शहरात लागू असलेल्या पुररेषेमुळे शासनाने पुररेषेत येणाऱ्या नागरिकांचे कोदवली साईनगर येथील पुर्नवसन वसाहतीत पुर्नवसन केले आहे. हे सर्व रहिवासी शहरातीलच आहेत. त्यांना पाणी पुरवठ्यासह कचरा उचलणे व अन्य सुविधा या नगरपालिकाच पुरवत आहे. त्यामुळे याच भागातील नागरिकांनी आम्हाला एका अर्जाद्वारे नगरपालिकेत सामावून घ्यावे, अशी मागणी केलेली आहे. तर कोंढेतड विभागातील काही भागातील नागरिक हे शहरात येतात, मात्र ते मालमत्ता कर हे ग्रामपंचायतीमध्ये भरत आहेत, त्यांनाही पालिकेत सामावून घ्यावे, रानतळे भागातील नव्याने अस्तित्वात आलेली वसाहत व धोपेश्वर चापडेवाडीतील भागाचा शहारात समावेश करावा अशी चर्चा यावेळी झाली. यामुळे शहराची लोकसंख्या वाढणार असून नगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. तर नगरपालिकेचा वर्ग बदल होऊन विकास निधीतही वाढ होणार आहे. अध्यक्षस्थानावरून नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनीही या प्रस्तावावर भूमिका मांडताना हे आवश्यक असल्याचे नमूद केले.
या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, ॲड. जमिर खलिफे, सुलतान ठाकूर, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, सौरभ खडपे, महेश शिवलकर, सुभाष बाकाळकर, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण यांनी सहभाग घेत आपली मते मांडली.
नगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी ५ टक्के निधी खर्च करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी नव्याने नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ द्यावा, असा निर्णय घेण्यात आला; मात्र ज्यांच्याकडे युआयडी प्रमाणपत्र आहे त्यांनी याचा लाभ द्यावा असेही नमूद करण्यात आले. यावेळी काही दिव्यांगांना अनेक वेळा लाभ देण्यात आल्याचा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. याबाबत प्रशासनाने काटेकोर पद्धतीने नियमांचे पालन करून अंमलबजावणी करावी असे निर्देश नगराध्यक्षा खलिफे यांनी दिले.
शहरात सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा डीपीआरच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खोदकाम केले जात आहे. त्यामुळे रस्ते खराब होत आहेत. तर पाणीपुरवठा टाक्यांच्या बाबतही सुयोग्य नियोजन केले जात नाही. दिवटेवाडी येथील पाणी टाकी बसविण्याबाबतही योग्य पद्धतीने कार्यवाही केली जावी अशी मागणी बांधकाम सभापती सुबोध पवार यांनी केली. तर आंबेवाडी व रानतळे भागातील पाण्याच्या टाकीचा मुद्दाही पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी उपस्थित केला.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आऊट पुट बेसीसवर सेवा पुरवण्याचा निर्णयाला मंजूरी देण्यात आली. पालिका सभागृहातील स्पिकर व्यवस्था अद्ययावत करण्याचा, कार्यालयात इंटरकॉम सुविधा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर जेसीबी तसेच स्वच्छता विभागासाठी एक घंटागाडी घेण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली. यावेळी सभागृहात झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरिल चर्चेत नगरसेवक सौरभ पेणकर, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर, सुयोगा जठार, साजिया काझी, अफरोज झारी, शबाना मुल्ला, सिद्धांत जाधव यांनी चर्चेत सहभाग घेत आपली मते मांडली. प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी सभागृहात माहिती दिली. तर कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी प्रशासकीय अहवालांचे सभागृहात वाचन केले.




