सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वाटप दिव्यांग बांधवांना भगिनींना काही कमी पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी, दि. 21 ) : दिव्यांगांना मान सन्मान देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी ठरावा, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे. माझ्या जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना, भगिनींना काही कमी पडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई फेरफार वापरकर्ते यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण आणि सहाय्यक उपकरणांचे दिव्यांगांना मोफत वितरण आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जि. प. सदस्य बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले,आजचा कार्यक्रम हा भावनिक आहे. प्रत्येक नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी असतो. हा निधी ज्यांना 40 ते 60 टक्के दिव्यांगत्व आहे, अशा लाभार्थ्यांना 12 हजार, जे 60 ते 80 टक्के आहेत त्यांना 14 हजार व 80 ते 100 असणाऱ्या लाभार्थ्यांना 16 हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या निधीमधून जे आवश्यक आहे, ते दिव्यांग बांधवांना घेता यावे म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शनिवारी 10 ते 12 या वेळेत मी स्वत: जिल्हा शासकीय रुग्णालयात आढावा घेणार आहे. दिव्यांगांवर अन्याय होत असेल, तर निश्चितपणाने कारवाई केली जाईल, त्यासाठीच मी स्वत: तेथे बसणार आहे. दु:खातून मार्ग काढण्यासाठी आम्ही उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील विधवा, परित्यक्ता एकल महिलांचे सर्वेक्षण करायच्या सूचना दिल्या आहेत. अशा महिलांना जिल्हा नियोजन मधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांची आर्थिक उन्नती राबविण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रातानिधिक स्वरुपात दिव्यांगांना साहित्याचे तसेच मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button