संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

रत्नागिरी, दि. २० मार्च : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य राहणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, बंधुभाव व मानवतेचा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्रातील संतपरंपरा, वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक ऐक्यभाव अधिक दृढ झाला असून त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी मा. श्री.डॉ. उदय सामंत आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

रत्नागिरी व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button