
कार जगबुडी नदीच्या कठड्यावर आदळून अपघात
खेड : मुंबई गोवा मार्गावरील जगबुडी पुलावर मोटार कारला अपघात झाला. ही घटना आज (१९ मार्च) सकाळी दहा वाजवण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मोटारी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अशी माहिती प्रत्यक्ष दर्शनी सांगितली. मोटारीचा वेग इतका होता की, कार थेट नदीकाठी असलेल्या कठड्यावर जाऊन अडकली. कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कठड्याकडे झेपावली. चालकाने शेवटच्या क्षणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी गाडी कठड्यावर जाऊन अडकली. या संपूर्ण घटनेत चालकाचे दैव बलवत्तर ठरले. जर कार कठड्यावर न अडकता पुढे गेली असती, तर ती थेट १०० ते १५० फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा अपघात टळल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वेगमर्यादा, सुरक्षाव्यवस्था आणि चालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.




