
किशोरवयीन मुले-मुलींची क्षमता बांधणी विभागीय कार्यशाळा रत्नागिरीत उत्साहात

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील सुमारे १०० किशोरवयीन मुले-मुलींसाठी क्षमता बांधणी (Capacity Building) प्रशिक्षण कार्यशाळा रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात उत्साहात आयोजित करण्यात आली. किशोरवयीन मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे तसेच त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, राज्यस्तरीय प्रशिक्षक व युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार श्रीमती अंजुम उप्पल, श्रीमती मैत्रेयी रेडेकर, अजय क्षीरसागर तसेच कोल्हापूर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, कुष्ठरोग सहाय्यक संचालक तथा प्रभारी जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेकानंद बिराजदार, सिंधुदुर्ग जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सुधीर धनगे, रत्नागिरी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शरण काठोळे तसेच रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम सय्यद ,प्रशांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींच्या शारीरिक बदलांविषयी माहिती, मानसिक आरोग्याचे महत्त्व, पोषण, वैयक्तिक स्वच्छता, जीवनकौशल्ये तसेच समाजात सकारात्मक नेतृत्व कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ प्रशिक्षकांनी सहभागी मुला-मुलींचे वेगवेगळे गट तयार करून संवादात्मक पद्धतीने प्रशिक्षण दिले. विविध उपक्रम, चर्चासत्रे आणि सहभागात्मक कृतींमधून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात आला तसेच त्यांच्या प्रतिक्रिया व अनुभव जाणून घेण्यात आले.
किशोरवयीन मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपणे ही काळाची गरज असून अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे त्यांच्यात जागरूकता, आत्मविश्वास आणि आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यशाळेत १०० किशोरवयीन मुले-मुलींसह ८ आशा कार्यकर्त्या, ८ शिक्षक तसेच ४ समन्वयक यांनी सहभाग नोंदविला. सहभागी सर्वांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरल्याचेही यावेळी सांगण्यात आले.




