
थर्स ऑरगॅनिकमध्ये ड्रमचा स्फोट; एक कामगार किरकोळ जखमी
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील थर्स ऑरगॅनिक नामक रासायनिक कारखान्यांमध्ये आज (१४ मार्च) सकाळी दहा ते साडे दहा दरम्यान रसायनाच्या ड्रमचा स्फोट झाला; मात्र कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ ड्रमला लागलेली आग विझवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तरीही या धावपळीत एका कामगाराचा पाय मुरगळून किरकोळ जखमी झाला.
लोटे एमआयडीसीमधील डॉक्टर खान कंपनीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच आज घडलेल्या या घटनेने पुन्हा खळबळ उडाली. औद्योगिक वसाहतीमधील थर्स ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्यात एका नवीन उत्पादनासाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रममध्ये रसायन मिश्रण करण्याचे काम चालू होते. मात्र यावेळी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे ड्रम मधील रसायनाचे तापमान अचानक वाढले आणि रसायनाने पेट घेतला. रसायन आणि पेठ घेतल्यामुळे त्या ड्रमचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज नजीकच असलेल्या अग्निशमनदला पर्यंत पोहोचला आणि अग्निशमन अधिकारी श्री. नलावडे अग्निशमन जवानांना घेऊन अग्निशमन बंबा सहीत तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र कारखाना व्यवस्थापनाने तत्पूर्वीच लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती नियंत्रणात आणले आणि मोठा अनर्थ टाळला.
दरम्यान, या धावपळीमध्ये एका कामगाराचा धावताना पाय मुरगळल्याने तो कामगार किरकोळ जखमी झाला. त्याला कारखाना व्यवस्थापनाने उपचारार्थ खाजगी गाडीने तात्काळ दवाखान्यात हलविले. यानंतर नजीकच असलेल्या चाळकेवाडी मधील ग्रामस्थांनी कारखान्याला भेट देऊन झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. ‘कारखान्यामध्ये प्रयोग अथवा प्रक्रिया चालू असताना योग्य ती सुरक्षा यंत्रणा वापरून काळजी घ्या नजीकच मानवी वस्ती आहे याचे भान ठेवा,’ असे कारखाना व्यवस्थापनाला सांगितले.




