
गुहागर घरफोडीप्रकरणी चारजण ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी : ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : शृंगारतळी (ता. गुहागर) बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे चारजणांना मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. निशांत सुधीर आंबोकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर, मुंबई), मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटाकोपर, मुंबई), सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहीनूर सीटी, कुर्ला, मुंबई) आणि आयुष जितेंद्र घागडा (रा. तानसा पाईपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई) यांना पंतनगर घाटकोपर (मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात घरफोडी, चोरी सारख्या यांसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले आहे. त्या अनुषंगाने गुहागर पोलीस ठाणे हद्दीत १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १.३० च्या सुमारास श्रृंगारतळी बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करून आतील शटर तोडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला होता. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने या गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहीतीच्या आधारे निशांत आंबोकर, मोईन शेख, सुमित चुनियाना व आयुष घागडा या चौघांना घाटकोपर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य असा ११, ९५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व श्रे. पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, गणेश सावंत, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर व चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी केली आहे.




