घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतला आढावाअडचणी, समस्यांसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 7057222233 वर संपर्क साधण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. 11 ) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस मिळण्यास कोणाची तक्रारी/अडचणी असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील भ्रमणध्वनी क्र. 7057222233 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले आहे.

जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सर्व तालुका स्तरावर पथक स्थापन करुन पथकादवारे गॅस एजन्सींना वेळोवेळी भेट देऊन गॅस पुरवठ्याबाबत आढावा घ्यावा, भेटीचे वेळी ग्राहकांशीही बोलावे, त्यांचे अभिप्राय/काही अडचण असल्यास विचारावेत व जिल्हा कार्यालयास तात्काळ कळवावे. यापूर्वी 2 सिलेंडरच्या बुकींगमध्ये 10 दिवसांचा गॅप होता, आता 25 दिवसांचा गॅप करण्यांत आला आहे. गॅपबाबतचा फलक सर्व एजन्सीबाहेर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी दिल्या.

या बैठकीमध्ये प्र. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्हयात घरगुती गॅसचा पुरवठा व्यवस्थित चालू आहे. तथापि गॅस टंचाई होऊ शकते या शंकेने गॅससाठी बुकींग करत असल्याने घरगुती गॅससाठी गर्दी होत असून बुकींग वाढल्याने वेटींगही वाढले असले, तरी पुरवठा करण्यामध्ये कोणतीही कपात नाही असे सांगितले. एचपीसीएल कंपनीचे मिरज हजारवाडी, बीपीसीएल कंपनीचे वाई, सातारा तर इण्डेन कंपनीचे सिलेंडर चाकण, पुणे येथून प्राप्त होतात. जिल्हयासाठी दैनंदिन सुमारे 6900 ते 7200 मागणी असून तीनही कंपन्यांकडून दररोज सरासरी 7500 घरगुती गॅस सिलेंडर प्राप्त होत आहेत. त्याप्रमाणेच त्याचे दररोज वितरण होत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व्यावसायिक सिलेंडरना गॅस देणे बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी रत्नागिरी तालुक्यातील एजन्सीच्या प्रतिनिधींकडून घरगुती गॅस सिलेंडरचा आढावा घेण्यात आला. शांतादुर्गा गॅस एजन्सीची ग्राहक संख्या 85 हजार असून सरासरी 1500 ते 1600 दैनिक घरगुती गॅस सिलेंडर वितरण, मनोरमा गॅस एजन्सी ग्राहक संख्या 17 हजार असून सरासरी 300 ते 350 दैनिक घरगुती गॅस सिलेंडर वितरण, रत्नागिरी गॅस एजन्सी ग्राहक संख्या 18 हजार असून सरासरी 300 दैनिक घरगुती गॅस सिलेंडर वितरण करण्यात येते. उपस्थित एजन्सीचे प्रतिनिधी यांनी घरगुती गॅसच्या डिलिव्हरीमध्ये काहीच अडचण नसल्याचेही सांगितले.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button